संडे स्पेशल – संपादकीय – काळिमा फासणारे पत्रकार


संपादकीय काळिमा फासणारे पत्रकार
आजच्या नव्या पिढीत पत्रकारितेची व्याख्याच बदललेली आहे. पत्रकारितेचा उपयोग करून काही पत्रकार समाजाच्या भावनाशी खेळ करत आहेत. ते फक्त स्वार्थासाठी पत्रकारितेचा वापर करत आहेत. पत्रकारिता भ्रष्ट आहे असे मी म्हणत नाही पण पत्रकार मात्र भ्रष्टाचारी होऊ शकतात यात तिळमात्र ही शंका नाही.सगळ्यांनाच एका मापात आपण नाही तोलू शकत कारण पत्रकाराचे अनेक प्रकार असतात.तेव्हा थोड्या फार जणांमुळे अख्खी पत्रिकरिता भ्रष्ट झाली असे आपण म्हणू शकत नाही.पण पत्रकारितेत थोडे व्यवहारीकीकरण आले आहे.ते कसे ते पहा?सर्व वृत्तपत्र कोणाच्या ना कोणाच्या तरी हातात आहेत म्हणजे भांडवल दार, राज्यकर्ते यांच्या पुढे मीडिया खरंच विकलं गेलंय याची प्रचिती आता काही बातम्यांतून येते.
बातमी ही सनसनाटी असायला पाहिजे .. मग त्यात सत्यतेचा अंश असो /नसो हे आजकालच्या बहुसंख्य ( काही सन्माननीय अपवाद आहेत ) पत्रकारांचे मार्गदर्शक तत्व आहे .


पत्रकार हा निरपेक्ष असावा आणि त्याने बातमी आहे तशी लोकांपर्यंत पोहोचवावी त्यावर स्वतःचे मत काय आहे ? किंवा त्या बातमीचा त्याच्या दृष्टीकोनातून काय अर्थ आहे हे सांगणे अपेक्षित आहे . बातमीचे विष्लेशण करण्याचे काम अभ्यासकांवर किंवा त्या विषयातील तज्ञ व्यक्तींवर सोपवायला पाहिजे ..
कुठल्या बातमीला किती महत्व आणि स्थान द्यायचे याचे तारतम्य बाळगणे जरूरीचे आहे असे वाटते . तसेच आपल्या हाती पत्रकारितेचे शस्त्र आहे ते जबाबदारीने वापरणे जरूरीचे आहे . लोक चवीने वाचतात्/ऐकतात म्हणून तुम्ही एखाद्याच्या खाजगी आयुष्यावर किती अतिक्रमण करणार ?
मधे मी एका प्रसिद्ध पत्रकार/ संपादिकेची मुलाखत ऐकली — त्या म्हणाल्या लोकांना मसाला हवा असतो आम्ही तो आमच्या बातम्यांमधे /लेखांमधे घातला नाही तर लोकं वाचणार नाहीत .. आणि म्हणे एकदा तुम्ही प्रसिद्ध व्यक्ती झालात कि तुमचे खाजगी आयुष्य संपते , ती तुमच्या प्रसिद्धीची किंमत असते .. हे खरं आहे कि प्रसिद्ध व्यक्तिंबद्दल लोकांना उत्सुकता असते पण म्हणून त्यांच्या खाजगी आयुष्यात कोणी आणि किती ढवळाढवळ करायची , त्याला काहीच मर्यादा नाहीत का? या गोष्टींचे भान आता खरंच पत्रकाराने राखायला हवे .