प्रस्थापितांचे संधीसाधू राजकारण

       संडे स्पेशल संपादकीय                                              प्रस्थापितांचे संधीसाधू राजकारण !                          निवडणुकांचे निकाल म्हणजे एकापरीने लोकशाहीमधील मतदारांचा कौल! कोणत्या लोकांचे निवडणुकीत प्राबल्य असते, कोणत्या लोकांना निवडणुकीत ‘से’ असतो आणि कोणती ‘लोकं’ लोकांचे प्रतिनिधित्व करायला सरसावतात, हे सारं सूक्ष्मपणे तपासलं तर आपल्या राज्यव्यवस्थेला ‘लोकशाही’ म्हणणं अनेकदा धाडसी वाटू लागत.
निवडणुका जवळ आल्यावर राजकीय पक्षांनी लोकहिताच्या योजना पोतडीतून बाहेर काढून एका मागोमाग एक जाहीर करत सुटायच्या आणि त्या आधारे एकदा निवडून आलं की त्या साफ विसरून जायच्या असतात, हा शिरस्ता सत्ताधारी पक्ष अधून मधून बदलले तरी बदलत नाही. निवडणुका जवळ आल्या की, नागरिकांमध्येही या संधीसाधू पक्षांकडून आपला तात्कालिक फायदा करून घेण्याची चढाओढच सुरू होते. इमारतींना उमेदवारांकडून रंग मारून घेणे, वा गृहनिर्माण संस्थेचे एखादे खर्चिक काम उमेदवारांकरवी करून घेणे सुरू होते. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आणि त्यात भेटवस्तू लुटणे हे प्रकार सुरू होतात. थोडक्यात लोकशाही राज्यव्यवस्थेतील निवडणुका हा सणासुदीचा काळ मानला तर या व्यवस्थेतील बहुतांश लोक या काळात ‘हात धुवून’ घेण्याच्या प्रक्रियेत सामील होतात. उरलेले तथाकथित बुद्धिवादी याबाबत उदासीन तरी असतात वा याबाबत चर्चा कुटण्यापलीकडे जात नाहीत.

प्रस्थापितांचे संधीसाधू राजकारण
         प्रस्थापितांचे संधीसाधू राजकारण

एकापरीने सत्ताधारी वा विरोधी पक्षांमधील तथाकथित लोकप्रतींनिधींनी निवडून आल्यावर पाच वर्षांत जनसेवेच्या नावाखाली जो प्रचंड मलिदा अवैध जमविला असतो, त्यातला ५-१० टक्के मलिदा लोकांना वाटून त्यांनाही एक प्रकारे या भ्रष्ट प्रक्रियेत सामील करून घेतलं जातं. लोकंही अनेकदा उमेदवारांनी केलेल्या या एका वेळेच्या वाटपाला कवटाळून त्यांच्या दीर्घकालीन उत्तरदायित्वावर तिलांजली देऊन मोकळे होतात. एकदा प्रजाच अशी निर्धास्त आणि निद्रिस्त वागू लागली की, मग त्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या जागरूकतेबाबत आणि प्रमाणिकपणाबाबत आणखी काय बोलायचे, अशी परिस्थिती एकापरीने आपणच निर्माण करून देतो. लोकशाही व्यवस्थेत लोकांच्या मतांवर निवडून येऊन काम करण्याचे प्रयत्न ते सोडूनच देतात! सरावलेली मंडळी पुन्हा पाच वर्षं धमाल साधून घेतात.
आता खरा प्रश्न हा आहे लोकशाही प्रक्रियेतील या निवडणूक खेळाचा रंग, ढंग, मैदान, पंच, नियम, पवित्रे हे सारे अधिक लोकशाहीपूर्ण कसे होणार? कसे करणार? कोण करणार? कधी होणार? या साऱ्या प्रश्नांचं नेमकं, एकच आणि ठोस उत्तर मिळणं जरा अवघडच आहे.यावरुन एकच आता जनतेनं समजून घ्यायला हवं की आजचंआजचे राजकारण अतिशय भ्रष्ट मार्गाने चालले असून, समाजाचे सर्व काही हडपण्यासाठीच बहुतांश राजकीय नेत्यांची स्पर्धा लागली आहे. राजकीय नेत्यांविषयीचा आदरही कमी होत आहे. अशा स्थितीत प्रामाणिक माणसांचे मौन घातक आहे. आपण गप्प बसल्यानेच ही वेळ आली आहे. हे चित्र बदलायचे असेल, तर सर्व सज्जनांनी पुढाकार घ्यायला हवा,सक्रीय राजकारणासाठी धडपडायला हवं!

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या