मळणीयंत्रात साडी अडकून गंभीर जखमी झालेल्या शेतमजूर महिलेचा मृत्यू,मोहोळ तालुक्यातील शिरापूर सो. येथील घटना*
मोहोळ; प्रतिनिधी
शेतात मुगाची रास करत असताना ४२ वर्षीय महिला शेतमजुराची साडी मळणी मशीन यंत्रामध्ये अडकली. त्यामुळे पाय अडकुन त्या जोराने डोक्यावर आपटल्या गेल्याने डोकीस मार लागुन त्यांचा मृत्यू झाल्याची घटना मोहोळ तालुक्यातील शिरापूर सो. येथे दि. २० सप्टेंबर रोजी सायं. ५ वाजण्याच्या दरम्यान घडली. भामाबाई महादेव कोळेकर असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव कोळेकर हे पत्नी भामाबाई,मुलगा व सून असे मोहोळ तालुक्यातील शिरापूर सो. येथे राहत असून मोलमजुरी करून कुटुंबाची उपजीविका करतात. दि. २० रोजी मोरवंची येथीलच रामा कोळेकर यांच्या शेतामध्ये मुगाची रास करण्यासाठी मजुरीने भामाबाई कोळेकर या इतर महिलांसह गेल्या होत्या.
दरम्यान ५ वाजण्याच्या सुमारास भामाबाई कोळेकर या मुगाची गढूडे उचलुन मशीन मध्ये टाकत असताना, मळणी मशीन फिरवणाऱ्या ट्रॅक्टरच्या जॉईन्टमध्ये व मळणी मशीनच्या यंत्रामध्ये साडी अडकली व त्यामुळे पाय अडकुन त्या जोराने डोक्यावर आपटल्या. त्या त्यांच्या डोकीस मार लागुन रक्तस्त्राव सुरू झाला.त्यावेळी त्यांना इतर महिला शेतमजूरांच्या मदतीने मोहोळ ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी चंद्रकांत ज्ञानदेव कोळेकर यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात खबर दिली असून अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.