*कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या ठिकाणी “मातृ – सुरक्षा सप्ताहास” सुरुवात, रोहन परिचारकांनी मार्गदर्शन करत दिल्या शुभेच्छा*
पंढरपूर;प्रतिनिधी
येथील कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशाले मध्ये प्रशालेच्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांच्या संकल्पनेतून जागतिक मातृ सुरक्षा दिनानिमित्त ‘मातृवंदन’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
आज पहिल्या दिवशी नर्सरी, ज्युनिअर केजी व सिनियर केजी च्या माता पालकांना प्रशालेमध्ये बोलावून त्यांच्या पाल्यांकडून मातांचे पाद्यपूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व माता पालकांचे आईची पूजा करणाऱ्या या छोट्या मुलांकडे पाहून मातांना गहिवरून आल्याचे दिसून आले. पंढरपुरात प्रथमच अशा प्रकारे मातृ-सुरक्षा दिन साजरा केल्याचे पालकांनी मनोगतामध्ये आपले मत व्यक्त केले. या मातृ सुरक्षा सप्ताह निमित्त प्रशालेमध्ये सात दिवस विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये इयत्ता १ली, २री विद्यार्थ्यांसाठी आई विषयी संस्कृत सुभाषित पाठांतर स्पर्धा, ३री ४थी विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन स्पर्धा, ५वी ६वी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, ७वी ८वी निबंध स्पर्धा आणि ९वी १०वी विद्यार्थ्यांसाठी ‘आई माझा गुरु ‘ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
या कार्यक्रमांमध्ये रोज विद्यार्थ्यांकडून आपल्या आईंचे पाद्यपूजन केले जाणार असून विद्यार्थ्यांनीच तयार केलेले ग्रीटिंग कार्ड मातांना भेट देण्यात येणार आहेत. या मातृ सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षिका परिश्रम घेताना दिसून आले. तसेच या कार्यक्रमाला संस्थेचे प्रमुख विश्वस्त श्री रोहन परिचारक यांनी शुभेच्छा दिल्या.